आपल्या बेधडक वक्तव्यांमुळे कायम चर्चेत येणारी अभिनेत्री कंगना रणौत सध्या तिच्या धाकड या चित्रपटामुळे चर्चेत येत आहे. या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करण्यात आलं होतं. मात्र, ऐन वेळी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटला. कंगनाचा अपयशी ठरलेला हा चौथा चित्रपट आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर कंगनावर आणि तिच्या चित्रपटांवर अनेक मीम्स व्हायरल होत आहेत.
धाकड रिलीज होऊन आठ दिवस झाले आहेत. मात्र, या चित्रपटाने आठव्या दिवशी केवळ ४२२० रुपयांची कमाई केली. इतकंच नाही तर संपूर्ण देशभरात या चित्रपटाची केवळ २० तिकीटंच विकली गेली. त्यामुळे बॉलिवूड क्वीनच्या चित्रपटाने इतकी कमी कमाई करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
दरम्यान, बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार तब्ब्ल 2000 पेक्षा जास्त स्क्रीन्समध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. तर वीकएंड जवळ आल्यावर या आकड्यांमध्ये कमालीची घसरण पाहायला मिळाली आहे. येत्या आठवड्याच्या शेवटी या चित्रपटाला सिनेमगृहातून गाशा गुंडाळावा लागतोय असं चित्र दिसत आहे.
