Devendra Fadnavis:कांदा, सोयाबीन आणि धान उत्पादकांसाठी केंद्राचा दिलासा; देवेंद्र फडणवीसांनी पंतप्रधानांचे मानले आभार

Devendra Fadnavis: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने बळीराजासाठी आज असंख्य महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत.

by Akash Rajbhar
Central relief for onion, soybean and paddy growers; Devendra Fadnavis thanked the Prime Minister

 News Continuous Bureau | Mumbai 

Devendra Fadnavis: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने बळीराजासाठी आज असंख्य महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. त्यात खास करून कांदा, सोयाबीन, धान आणि तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. या निर्णयाबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विशेष आभार मानले आहेत.

केंद्र सरकारचे हे निर्णय शेतकऱ्यांसाठी क्रांतिकारक ठरतील, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधानांचे आभार मानले आहेत. केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार खाद्यतेलाच्या आयातीवर आता वीस टक्के शुल्क आकारण्यात येणार आहे. पूर्वी खाद्यतेलच्या आयातीवर शुल्क नसल्याने आपल्या देशातील आणि राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा फटका बसत होता. आता मात्र सोयाबीन उत्पादकांना चांगली किंमत मिळेल, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

ते म्हणाले केंद्र सरकारने रिफाइंड सोयाबीन, सूर्यफूल आणि पाम तेलावरील कस्टम शुल्क 12.50% वरून 32.50% केल्याने याचा थेट फायदा आपल्या शेतकऱ्यांना होणार आहे. सोयाबीन खरेदीचा निर्णय केंद्र सरकारने याआधीच घेतला आहे, याकडे फडणवीस यांनी लक्ष वेधले.

यंदाच्या वर्षी जानेवारी ते मार्चमध्ये कांदा निर्यातीवर 40% शुल्क आकारण्यात आल्याने त्याचा फटका उत्तर महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला होता. लोकसभा निवडणूकीत त्याचा अप्रत्यक्ष फटका भारतीय जनता पक्षालादेखील बसला होता. ही चूक सुधारून केंद्र सरकारने आज कांद्यावरील निर्यात शुल्क 40 टक्क्यांवरून २० टक्के इतके कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

शिवाय कांद्याची निर्यात करताना किमान निर्यात (एम ई पी) किंमत हे पूर्णपणे संपवली आहे. यामुळे कांदा उत्पादकांना आता चांगला भाव मिळेल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

बासमती तांदळाच्या निर्यातीसाठी असलेली किमान निर्यात किंमतदेखील पूर्णपणे मागे घेण्यात आल्यामुळे बासमती तांदूळ उत्पादक शेतकऱ्यांना देखील याचा मोठा फायदा होईल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. शेतकऱ्यांच्या शेतमालाला जास्तीत जास्त भाव मिळण्याच्या दृष्टीने हे क्रांतिकारक निर्णय असल्याचे फडणवीस म्हणाले.

Disclaimer : Except for the headline, this story has not been edited by News Continuous staff and is published from a syndicated feed.

Join Our WhatsApp Community

You may also like